Ad will apear here
Next
नय्यरसाहेब!
मुंबईतील चर्चगेट परिसरातील ‘शारदा’ या आपल्या निवासस्थानी गाताना, १६ जानेवारी १९८७ रोजी टिपलेले ओ. पी. नय्यर यांचे प्रकाशचित्र. – सतीश पाकणीकर

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने संगीतप्रेमींच्या मनावर गारूड केलेले ख्यातनाम संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा १६ जानेवारी हा जन्मदिन, तर २८ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला, नय्यरसाहेबांसोबतच्या काही आठवणी जागवणारा हा लेख... 
......
पूर्वस्मृतींच्या पोतडीतून कधी कोणती आठवण उसळून वर येईल याचा आपल्याला कधी सुगावा लागतो का? अन् समजा सुगावा लागला तर त्या आठवणी याव्यात किंवा येऊ नये यासाठी आपण काही करू शकतो का? मनावर कोरले गेलेले प्रसंग, व्यक्ती त्या त्या वेळच्या चित्रांसह जसेच्या तसे समोर उभे राहतात, ही कधी त्रासदायक तर कधी आनंददायक बाब असते ही आपल्याला मिळालेली देणगीच तर आहे. काल रात्री अंथरुणावर पाठ टेकताना मला जरासुद्धा वाटले नव्हते, की सकाळी झोपेतून जागा झाल्यावर एक आठवण मला तीस वर्षांपूर्वीच्या प्रसंगात घेऊन जाणार आहे; पण मनाने अल्लदपणे तो प्रवास घडवलाच. 

दर वर्षीप्रमाणे १६ जानेवारी १९८७च्या सकाळी चर्चगेटच्या ए रोडवरच्या ‘शारदा’ इमारतीत आम्ही काही जण पोहोचलो. निमित्त होतं संगीतकार ओ. पी. नय्यर या आमच्या आवडत्या संगीतकाराच्या जन्मदिनाचं! ऑफ व्हाइट खादी सिल्कचे कपडे, सोनेरी काडीचा चष्मा आणि डोक्यावर काळी हॅट घातलेल्या नय्यरसाहेबांनी स्वतःच दार उघडून आमचं स्वागत केलं. पुढचे चार तास हे विसरता येणार नाहीत असे संगीतमय प्रवासाचे होते. आनंदाची बातमी होती, की नय्यरसाहेबांनी नवीन चित्रपट साइन केलाय. गीतकार नूर देवासी यांच्या गीतांना चाली बांधून तयार होत्या. काही गाणी ध्वनिमुद्रित झाली होती. ती गाणी ऐकण्याची उत्सुकता तर होतीच; पण ते सुचवण्याचा धीर काही होत नव्हता. इतक्यात त्यांच्या मुलीचे आगमन झाले अन् ही गोष्ट आमच्या पथ्यावर पडली. 

तिने सुचवताच नय्यरसाहेबांनी हार्मोनियम पुढ्यात ओढली. त्यांची जादुई बोटे हार्मोनियमवर फिरू लागली. किंचित बसक्या, पण अतिशय भावनाप्रधान आवाजात त्यांनी गायला सुरुवात केली... शब्द होते – ‘किताबे इश्क का पढना कभी खराब नहीं... किताबे इश्क से बेहतर कोई किताब नहीं...’ एकामागून एक गाणी नय्यरसाहेब गात होते. भावनांनी ओतप्रोत असलेली ती गाणी ऐकताना, त्या गाण्यातल्या मधल्या जागा ऐकताना हा संगीतकार मधली काही वर्षे फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर फेकला गेला होता याच्यावर विश्वास बसत नव्हता. ही मैफल संपल्यावर नय्यरसाहेबांनी स्वतः आग्रहाने प्रत्येकाला मोतीचुराचे लाडू खायला घातले. चहा-कॉफी झाली. सगळं वातावरण हलकं-फुलकं होऊन गेलं. 

त्यांच्या त्या हॉलमध्ये एक ग्रँड पियानो ठेवलेला होता. मी नय्यर साहेबांना म्हटले, की त्या पियानोवर मला तुमचा एक फोटो काढायचाय. त्यांना चाहत्यांनी दिलेले फुलांचे गुच्छ पियानोवर ठेवलेले होते. त्याकडे हात करून नय्यरसाहेब म्हणाले – ‘ये सब हटाना पडेगा। कुछही दिनों में मेरा रेकार्डिंग है। आ जाना उस वक्त।’ आंधळा मागतो एक... अशी माझी अवस्था! 

काहीच दिवसांत त्यांच्या निमंत्रणावरून मी ताडदेवच्या फेमस स्टुडिओमध्ये माझ्या कॅमेऱ्यासह दाखल झालो. बरोबर नऊ वाजता नय्यरसाहेब आले. वादक मंडळी आधीच आलेली. गायिका अनुराधा पौडवाल, कोरसच्या गायिकाही हजर. वाद्यांचे ट्युनिंग झाले. उस्ताद सुलतान खाँ सारंगी जमवून बसलेले. गाण्याची रिहर्सल झाली. बरोबर दहा वाजता नय्यरसाहेबांनी माइक हातात घेऊन प्रत्येकाला सज्ज राहण्याची सूचना केली. स्टुडिओत एकदम शांतता पसरली. एकेका वाद्याचे रेकॉर्डिंग टेस्टिंग सुरू झाले. पाच-पाच मिनिटांत गिटार, पियानो, सारंगी, सतार, व्हायोलीन, तबला, ढोलकं, घुंगरू, बासरी यांच्या पोझिशन ठरवून दिल्या गेल्या. प्रत्येकाच्या समोर नोटेशनचे कागद दिले गेले. सूचना झाल्या. सर्व जण रेकार्डिंगसाठी सज्ज झाले. गाण्याच्या टेकची घोषणा झाली. हे सर्व मी स्तंभित होऊन अनुभवत होतो. 

हे सर्व करताना साठीचे नय्यरसाहेब चपळाईने, सहजतेने वावरत होते. साडेदहा वाजले. शेवटची सूचना झाली. ‘सुभानल्ला साँग नंबर ५, फायनल टेक, रेडी!’ अनुराधा पौडवाल व कोरसच्या आवाजातील गाणं दहा मिनिटांत ध्वनिमुद्रित झालं. शब्द होते – ‘नथानियां में मोती जडे प्यार के, सवा लाख लगते है दीदार के...’ इतक्या कमी वेळात, पहिल्याच टेकला गाणं ध्वनिमुद्रित झाल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. रेकॉर्डिस्ट श्री. भन्साळीसुद्धा खूष झाले होते. वादकांपैकी एकाला मी विचारताच तो म्हणाला, ‘नय्यर साहेबांच्या रेकॉर्डिंगला उशीर झालाय, कंटाळा आलाय असं कधी आठवतच नाही. त्यामुळे वादक जीव ओतून मेहनत करतात. आपल्या वादनाचं चीज होणार हे त्यांना माहीत असतं.’ त्याच्या या प्रतिक्रियेतच नय्यर यांच्या सर्व गीतांच्या यशाचं रहस्य दडलेलं आहे.

ओ. पी. नय्यर – फेमस स्टुडिओ, ताडदेव, मुंबई (सप्टेंबर १९८७) – सतीश पाकणीकर

नंतर मग आधीची रेकॉर्ड झालेली गाणी नय्यरसाहेबांनी ऐकविली. नय्यरसाहेबांनी आपुलकीने प्रत्येकाच्या मानधनाची पाकिटे दिली व पॅकअपची ऑर्डर दिली. पॅकिंगची लगबग सुरू झाली. मी मंत्रमुग्ध झालो असतानाच अचानक मला पियानोबरोबर नय्यरसाहेब या फोटोची आठवण झाली. मी नय्यरसाहेबांसमोर गेलो व फोटोबद्दल बोललो. त्यांनी लगेचच तेथील एका कामगाराला पियानोवरील कव्हर काढण्यास फर्मावले. मी व नय्यरसाहेब पियानोपाशी गेलो. तेथील उंच खुर्चीवर बसून एक हात पियानोच्या पट्ट्यांवर ठेवून त्यांनी सहजपणे हसत ‘पोझ’ दिली. माझं काम झालं होतं. माझ्या संग्रहात माझ्या फर्माईशीप्रमाणे एक प्रकाशचित्र जमा झालं होतं. 

आज नय्यर साहेब जाऊन दहा वर्षे झाली. या दहा वर्षांत वेळोवेळी त्यांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलंय. अडचणीच्या प्रत्येक वेळी त्यांच्या गाण्यांचा सहारा मात्र आहे. 

- सतीश पाकणीकर
(लेखन दिनांक : २८ जानेवारी २०१७)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KUVOCU
Similar Posts
‘हास्यरेषांचा आनंदयात्री’ २९ जुलै हा हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...
‘ख्याल-महर्षी’ ऋषितुल्य ख्यालमहर्षी पं. मल्लिकार्जून मन्सूर यांचा स्मृतिदिन १२ सप्टेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
कॅमेऱ्यामागचा जादूगार! सुप्रसिद्ध फ्रेंच फोटोग्राफर हेन्री कार्तीय ब्रेसाँ यांनी सर्व फोटोग्राफर्सबद्दल असे म्हणून ठेवले आहे, की ‘आम्ही या जगातील असे प्रेक्षक आहोत, जे जगाकडे सदासर्वकाळ पाहत असतात; पण आमच्या निर्मितीचा मात्र एकच एक क्षण असतो तो म्हणजे जेव्हा आमच्या कॅमेऱ्याचे शटर एका सेकंदाच्या अंशाने क्लिक होते तो क्षण!’
स्वर-भावगंधर्व २६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language